Thursday, April 21, 2011

शिवसेनेचे नीरो!







अणूऊर्जा ही काळाची गरज आहे. काही बाबी काळाची पाऊले ओळखून स्वीकारायच्या असतात. इंधनाचे सर्व पर्याय जेव्हा काळाच्या ओघात संपणार आहेत, तेव्हा अणूऊर्जा हाच पर्याय सक्षम ठरेल. परंतु, प्रस्तावित जैतापूर प्रकल्पाला विरोध करून शिवसेना विकासाला आडकाठी घालत आहे. बरे, यानिमित्ताने शिवसेना नेतृत्त्वाच्या खंबीर की काय त्या नेतृत्त्वाचीदेखील परीक्षा झाली. या परीक्षेत उद्धव ठाकरे काठावरदेखील उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. जैतापुरातील स्थानिकांचा कळवळा असल्याचा डिंडोरा पिटणारे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव हे जैतापुरात पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या तरुणांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करतील, जखमींची विचारपूस करून त्यांना मदत मिळवून देतील, त्यांच्या दु:खात सहभागी होतील, अशी भाबडी अपेक्षा शिवसैनिकांना होती. मात्र, शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेचे हे खंबीर नेतृत्त्व तिकडे फिरकलेही नाहीत. उलटपक्षी जैतापूर पेटले असताना कार्याध्यक्ष मध्य प्रदेशातील कान्हा-केसली या राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा आनंद लुटत होते. तसेही राज्यात शिवसेनेचे ढाण्या वाघ फारच मोजके शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कान्हा अभयारण्यातील वाघांना पाहून आपले दु:ख हलके करण्याचा पर्याय तर ठाकरे यांनी निवडलेला नाही ना, अशी राजकीय चर्चा यानिमित्ताने सुरु झाली होती. एक ऐतिहासिक भयानक वास्तव आहे. म्हणे, रोम जळत असताना, नीरो फिडल वाजवित होता. शिवसेनेचे हे नीरोदेखील जैतापूर पेटवून जंगल सफारीचा आनंद लुटत होते. त्यामुळेच कदाचित, भविष्यात जैतापूर जळत असताना, उद्धव कॅमेर्‍याने छायाचित्रे टिपत होते, अशा वाक्याने शिवसेनेच्या असंवेदनशीलपणाचे वर्णन केले जाईल. मुंबईवर जेव्हा २६/११ चा अतिरेकी हल्ला झाला होता. तेव्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वत: मुंबईत येऊन शहिदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. मालेगाव येथील बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांचीदेखील त्यांनी तातडीने भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला होता. एकीकडे सोनिया गांधी यांना शिव्यांची लाखोली वाहणार्‍या शिवसेनेने श्रीमती गांधी यांच्यापासून नेतृत्त्व गुण घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे वाटते. सोमवारी शिवसैनिक प्रस्तावित अणूप्रकल्पावर चालून गेले. त्यांनी पोलिसांवरदेखील हल्लाबोल करत, पोलिस ठाणे जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. दीर्घ कालावधीनंतर अशा प्रकारचे शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्रवासीयांना पाहावयास मिळाले असेल. यावेळी झालेल्या पोलिस गोळीबारात नाटे येथील तरबेज सेहकर हा मुस्लिम तरुण ठार झाला. हा तरुण शिवसैनिक होता, की नव्हता हा वादाचा मुद्दा असला तरी तो आंदोलक मात्र होता. त्याच्या मृत्यूचा मुद्दा शिवसेनेच्यावतीने विधिमंडळात उपस्थित करून सरकारचा निषेधही नोंदवण्यात आला. सरकार जनतेवर अत्याचार, दडपशाही करत असल्याचा आरोप करणार्‍या शिवसेनेचे कार्याध्यक्ष ठाकरे थेट जैतापुरात पोहोचून तेथील जनतेसोबत उभे राहतील, पोलिसी गोळीबारात बळी गेलेल्या किंवा जखमींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतील, अशी स्थानिकांची अपेक्षा होती. मात्र, एकीकडे शिवसेनेचे खालच्या फळीतील नेते, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले असताना उद्धव ठाकरे मात्र सोमवारी रात्री नागपूरला पोहोचले. किमान तेथे तरी ते माध्यमांशी बोलून जैतापूरच्या घटनेचा निषेध नोंदवतील, असे वाटत होते. सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास नागपूरच्या हॉटेल प्राईडमध्ये त्यांनी पत्रकारांना भेटही नाकारली. त्यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी पत्रकारांना मंगळवारी सकाळी यायला सांगितले. मात्र, पत्रकार पोहोचण्यापूर्वीच ठाकरे, त्यांचे पुत्र व नार्वेकर विमानाने कान्हा केसली अभयारण्याकडे रवाना झाले होते. मंगळवारी सकाळी त्यांचे विमानतळावर चित्रीकरण करणार्‍या काही वाहिन्यांच्या पत्रकारांना हटकून चित्रिकरण थांबवण्यास सांगण्यात आले. विधिमंडळातही या जंगल सफारीचा उल्लेख आमदारांनी केला. विधानसभेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यकर्त्यांचा बळी गेला, त्याचा मृतदेह तेथे पडले असताना उद्धव ठाकरे कुठे आहेत, कान्हात ते काय करत आहेत, असा सवाल विचारला. विधान परिषदेत किरण पावसकर यांनीही शिवसेनेवर अशीच टीका केली होती. आंदोलने अशी लढविली जातात काय?, हा सवाल उद्धव यांना कोण विचारणार हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. सेनापती जंगल सफारीवर जाऊन सैनिक जैतापुरात लढत असतील तर त्याचे या सैनिकांच्या मनोध्यैर्यावर काय परिणाम होतात, याचा विचार तरी त्यांनी करायला हवा होता. शिवसेनेची एकहाती कमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांभाळली तेव्हा ते शिवसैनिकांसोबत असायचे. स्वतः आंदोलनात उभे ठाकायचे, एक झंझावात निर्माण व्हायचा हा इतिहास आहे. म्हणूनच, त्यांच्या आदेशावरून शिवसैनिक शीर हातावर घेऊन लढायला उभे ठाकत. शिवसेना म्हणजे आक्रमक पक्ष अशी ख्याती निर्माण झाली, ती बाळासाहेबांच्या कणखर नेतृत्त्वाने. वडिलांचे हे गुण उद्धव कधी स्वीकारणार आहेत! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब पाहाण्याची सवय या महाराष्ट्राला का झाली, याचे उत्तरदेखील उद्धव यांच्या कृतीतूनच मिळते. कार्यकर्ते लढत असताना राज ठाकरे कधी जंगल सफारीला गेले नाहीत. किंवा, आपल्या आलिशान बंगल्यातून त्यांनी कधी आदेशही दिले नाहीत. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणजे, कार्यकर्त्याला बळ मिळते, आंदोलनाला धार येते आणि नेत्यासाठी जीव देणारे कार्यकर्तेही निर्माण होतात. मुंबई पाण्यात बुडाली असताना म्हणे, उद्धव ठाकरे पंचतारांकित हॉटेलात मुक्काम ठोकून होते, असे नेतृत्त्व पक्षावर फारकाळ पकड ठेवून राहू शकत नाही. जैतापूर पेटवले ना, तर मग या आंदोलनाच्या बरेवाईट परिणामांची फळेदेखील स्वतः भोगण्याची तयारी ठेवावी लागते. बळी जाणार्‍या कार्यकर्त्यांचे संसारही उभे करावे लागतील. एका मृतकाला केवळ दोन लाख रुपये देऊन त्याचे कुटुंब सावरणार नाही, हे उद्धव यांनी लक्षात घ्यायला हवे.



Sunday, April 17, 2011

पूनम पांडे नावाची मोकाटी


पूनम पांडे नावाची मोकाटी भारतीय क्रिकेट संघाच्या विश्‍वचषक विजयानंतरही एक बातमी सातत्याने चर्चेत राहात आली आहे. ही बातमी आहे, मॉडेल तथा अभिनेत्री पूनम पांडे हिला म्हणे, नग्न व्हायचे आहे. भारतीय संघ जिंकला तर आपण क्रिकेटच्या मैदानात नग्न (गावरान भाषेत ज्याला भोंगळे) होऊ अशी घोषणा या पूनमबाईने केली होती. केवळ नग्नच होणार नाही तर नग्न होऊन मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये फेरी मारू, अशी वल्गनाही या बाईने केली होती. साहजिकच आहे, की तिची ही वल्गना वृत्तपत्रांत ठळकपणे छापल्या गेली. वृत्तवाहिन्यांवर ती चवीने चघळल्या गेली. म्हणे, आता तू कधी नग्न होणार आहेस, असा सवाल या बाईला तिचे काही रंगेल चाहते विचारत आहेत. तिची ही घोषणा सवंग प्रसिद्धीसाठी होती, असा विचार केला तर ही बाई अद्यापही आपण नग्न होणारच असे वारंवार सांगत आहे. तिची ही खुमखुमी कधी जिरेल ते देव जाणे. सध्या चित्रपट व मॉडेलिंगच्या क्षेत्रात अभिनेत्रींचे अंगप्रदर्शन ही काही नवी बाब नाही. जे खपते ते विकावे, या व्यापारी न्यायाने या अभिनेत्री त्यांच्या कमनीय शरीराचे उत्तान प्रदर्शन मांडत असतात. त्यामुळे या अभिनेत्री अनेकवेळा वादाच्या भोवर्‍यातदेखील अडकलेल्या आहेत. अनेक प्रकरणे तर न्यायालयातदेखील पोहोचलेली आहेत. अभिनेत्री आणि मॉडेल त्यांचे अंगप्रदर्शन कसे योग्य होते, चित्रपट किंवा जाहिरातीची गरज म्हणून ते कसे आवश्यक होते, हे पटवून देत असतात. परंतु, पूनमबाईसारखी सार्वजनिक ठिकाणी नग्न होण्याची इच्छा कोणत्याही अभिनेत्रीने किंवा मॉडेलने आजवर जाहीर केली नव्हती. ज्या बाबीपासून त्यांना पैसे मिळत नाहीत तेथे या मॉडेल आपले कपडे उतरवत नाहीत, असा एक अनुभव आहे. परंतु, आपल्या नग्न होण्याला देशभक्तीची किनार देत या पूनमबाईने वानखेडे स्टेडिअममध्ये खुलेआम नग्न होण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली. तिचे हे दुःसाहस निश्‍चितच समर्थनीय नसले तरी तिच्या मूर्खपणाची कदर करावी, असे आहे. आपल्या वाचाळपणाचे समर्थन करताना या बाईने एवढेही सांगितले, की आपल्या या कृत्याला तिच्या आई-वडिलांचे समर्थन आहे. स्वतःची तरणीबांड लेक लोकांसमोर नग्न होण्यास परवानगी देणारे तिचे आई-वडील खरेच धन्य म्हटले पाहिजेत. आता जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने विश्‍वचषक जिंकला आहे, तेव्हा ही पूनमबाई म्हणते, की आपण आजही नग्न होण्यास तयार असून, त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिला परवानगी द्यायला हवी. परंतु, बीसीसीआयच काय, कोणतीही जबाबदार संस्था अशा प्रकाराला परवानगी देत नसते, हे या पूनमबाईला माहीत नसावे, एवढी ही बाई नक्कीच दूधखुळी नाही. पूनम हिचा सार्वजनिक ठिकाणी नग्न होण्याचा हव्यास खरा तर समस्त स्त्री जातीसाठी कलंक आहे. ती स्वतः एक स्त्री असून, आपल्या या कृत्याने स्त्रीजातीवर काय आपत्ती कोसळेल, याचा विचार ही नालायक बाई करत नाही, याचे दुःख वाटते. स्त्रियांच्या अस्मितेसाठी वारंवार कंठशोष करणार्‍या महिला संघटना आता का म्हणून मूग गिळून बसल्या आहेत, हादेखील एक मोठा प्रश्‍न उपस्थित होतो. धर्म व संस्कृतीच्या संरक्षणाचा ज्यांनी ठेका घेतला आहे, ती मंडळीदेखील आता थंड बसलेली आहेत. कदाचित, त्यांनादेखील पूनमबाईला नग्न पाहण्याची उत्सुकता लागून राहिली असावी. पूनम पांडे ही एक अशी तरुणी आहे, जिचे किंगफिशर कॅलेंडरवरील छायाचित्रे पाहिली, की तिला नग्न पाहावे, असे काही उरतच नाही. मॉडलिंग करताना अंगावर इंचभर कपडे वापरणार्‍या या बाईला हे माहीत नसावे, की या देशातील लक्षावधी अबलांच्या इज्जतीवर जेव्हा कोणीतरी अत्याचारी हात घालतो, तेव्हा अंगावरील वस्त्र वाचविण्यासाठी तिचा जीव कसा कासाविस होतो? इज्जत काय असते, हेच जिला माहीत नाही, त्या पूनमबाईने नग्न होणे काय आणि अंगभर कपडे घालणे काय, त्याने फरक तरी असा कोणता पडतो. आमच्या देशात दररोज किती तरी महिला शारीरिक व मानसिकदृष्ट्या कुणाच्या तरी शोषणाच्या बळी ठरत असतात. कधी कधी त्यांच्या अंगावरील कपडेदेखील फेडले जातात. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशात एका ग्रामीण परिवारात संपत्तीच्या वादातून झालेल्या भांडणात सुनेला विवस्त्र करून घरातून हाकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. काही वर्षांपूर्वी गुजरातमधील राजकोटमध्ये हुंडापीडितेला अर्धनग्न करून भररस्त्यावर तिची धिंड काढण्यात आली होती. छत्तीसगडमध्ये जादूटोणा करते या संशयावरून काही महिलांना नग्न करून भररस्त्यावर हिंडवण्यात आले होते. ज्या महिला सार्वजनिक ठिकाणी निर्वस्त्र होण्याच्या वेदना व अपमान झेलून बसल्या आहेत, त्यांनाच अंगावर वस्त्र असण्याची काय किंमत असते हे चांगले कळू शकते. पूनबाईसारख्या बाजारबसवीला ही किंमत कशी कळणार? मॉडलिंगसाठी म्हणा, किंवा श्रीमंतांच्या पार्ट्यात त्यांच्या इच्छेखातर टीचभर कपड्यात अंगप्रत्यांग दाखवत हिंडणारी पूनम पांडे हिला तर तिच्या अंगावरील वस्त्रेही ओझेच वाटत असावे. वांझोटीला बाळंतपणाच्या वेदना कळत नसतात, तसे जिला इज्जत नावाचा काही प्रकारच ठाऊक नाही, तिला स्त्रीच्या इज्जतीचे मोल कसे उमगणार. खरे तर ग्लॅमरच्या भुलभुलैय्यात झुलणार्‍या या पूनमबाईच्या अज्ञानावर किव येते. परंतु, तिच्या मूर्खपणाबद्दल तिला क्षमा करणे योग्य ठरणार नाही. पूनमला हे माहीत होते, की बीसीसीआय तिला नग्न होण्यास परवानगी देणार नाही. तरीदेखील केवळ अन् के़वळ सवंग प्रसिद्धीसाठी ही मूर्खबाई सातत्याने मी नग्न होणारच अशा बढाया मारते आहे. तिला या वाचाळतेने सवंग प्रसिद्धी मिळत असली तरी या देशाच्या उत्तर-पूर्व भागात भारतीय लष्कराच्या लैंगिक अत्याचाराचा निषेध म्हणून विवस्त्र होत, जाहीर निषेध नोंदविणार्‍या महिलांचा मात्र घोर अपमान होत आहे. प्राणी हक्कांसाठी विवस्त्र होत मॉडलिंग करणार्‍या पेटा संस्थेच्या मॉडेलचाही अपमान होत आहे, तसेच कुणाच्यातरी वासनेला बळी पडत देशाच्या कानाकोपर्‍या इज्जत लुटल्या जाणार्‍या व कपडे फेडल्या जाणार्‍या शीलवान नारीचाही घोर घोर अपमान होत आहे. नग्न होण्याची एवढीच खुमखुमी असेल ना, तर पूनमबाईने जरूर नग्न व्हावे, प्राणी वाचविण्यासाठी पेटा संस्थेची एखादी जाहिरात फुकट करून दाखवावी, पूर्वेला जाऊन विवस्त्र आंदोलन छेडणार्‍या त्या महिलांना जाऊन मिळावे. ही हिंमत ही मोकाटी बाई दाखविणार का?

Sunday, April 10, 2011

नव्या क्रांतीची पहाट..



भ्रष्टाचार हा या देशाला लागलेला कलंक आहे आणि हा कलंक कायमस्वरूपी मिटवल्या जावा, यासाठी कठोरात कठोर कायदा व्हावा, ही प्रत्येकाचीच इच्छा होती. वाढत्या भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका कोणाला बसत असेल तर तो या देशातल्या युवा पिढीला. शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लागणार्‍या सरकारी दाखल्यांपासून ते पुढे शासकीय नोकरी मिळवण्यापर्यंत पैसा चारल्याशिवाय कामेच होत नाही, हा विदारक अनुभव ही पिढी घेत आली होती. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी अण्णा हजारेंच्या रूपाने जेव्हा एक महात्मा नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आमरण उपोषणास बसला तेव्हा पीडलेली, संतापलेली हीच युवा पिढी अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि एका नव्या क्रांतीची पहाट या देशात उजाडली. भ्रष्टाचार्‍यांचे कर्दनकाळ ठरणारे लोकपाल विधेयक तत्काळ मंजूर व्हावे, यासाठी तब्बल ९७ तासांचे आमरण उपोषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत केले. प्रारंभी हे उपोषण गांभीर्याने न घेणार्‍या केंद्र सरकारला देश जेव्हा हजारेंच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसले तेव्हा हजारेंसमोर झुकण्याशिवाय कोणतेही गत्यंतर राहिले नाही. जनलोकपाल विधेयकाबाबत वारंवार चर्चा होत आली आहे. या विधेयकाच्या लागू होण्याने देशातील भ्रष्टाचार्‍यांना कठोरात कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, किंबहुना भ्रष्टाचार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. खरे तर जनकल्याणाचा वसा घेणार्‍या कोणत्याही सरकारने स्वत:हून हे विधेयक पारित करून घ्यायला हवे होते. परंतु, तसे झाले नाही. सर्वच पक्ष हे भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाला हे विधेयक नको आहे, शिवाय कॉंग्रेससारख्या सर्वाधिक भ्रष्ट पक्षाला तर या विधेयकाचे सर्वाधिक वावडे राहात आले आहे. हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी आमरण उपोषण छेडले नसते तर कदाचित या विधेयकाबाबत भिजत घोंगडे असेच कायम राहात आले असते. या विधेयकासाठी मसुदा समिती गठीत करणे आणि या समितीवर कलंकीत मंत्र्यांना न घेणे तसेच त्यातील अर्धे सदस्य सामान्य नागरिकांतून असावेत, असा एक आग्रह हजारे यांनी सरकारकडे धरला होता. तसेच, या समितीचा अध्यक्ष हा सामान्य नागरिकांतून असावा, असाही त्यांचा आग्रह होता. ही मागणी मान्य करण्यासाठी तसेच पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडणार असल्याचे सांगण्यासाठी केंद्र सरकारने अण्णांसारख्या महात्म्याला तब्बल ९७ तास आत्मक्लेश करण्यास भाग पाडले. परंतु, त्यांच्या या आत्मक्लेशातून देशभर एका क्रांतीची लाट उसळली. जंतर मंतर या उपोषणस्थळाला तहरीर चौकाचे स्वरूप आले आणि आखाती देशांप्रमाणे भारतातदेखील सत्तापालटाची जोरदार लढाई सुरू होते की काय, असे वातावरण निर्माण झाले. सरकारने अण्णांच्या आत्मक्लेशाची सत्त्वपरीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला असता, तर अण्णांचे हेच आमरण उपोषण देशाच्या दुसर्‍या स्वातंत्र्याची लढाई ठरले असते आणि पिचलेले, हताश झालेले कोट्यवधी तरुण या आंदोलनात सक्रिय होऊन, सत्तापालट घडविण्यात आला असता. कदाचित देश एका रक्तरंजित क्रांतीच्या दिशेनेही गेला असता. या देशातील तरुणांच्या आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम हजारे यांच्या या उपोषणातून झाले आहे, ही फार फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. देशावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेव्हा हा देश एकवटत असतो, असा अनुभव आहे. अशा वेळी संपूर्ण बॉलिवूडदेखील आपल्या नैतिक भूमिकेशी प्रामाणिक राहात, देशहितासाठी पुढे सरसावत असते. याचा प्रत्यय हजारे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला. अख्खे बॉलिवूड हजारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. महानायक अमिताभ बच्चन ते आमीर खान या सर्वांनी हजारे यांच्या आंदोलनाला देशहिताची लढाई ठरवून क्रिकेटपेक्षा जास्त पाठिंबा देण्याचे आवाहन देशवासीयांना केले. देशात अण्णांच्या आंदोलनाची जोरदार लाट निर्माण करण्यास बॉलिवूडचे तारे खर्‍या अर्थाने यशस्वी झालेत. प्रत्येक शहर, प्रत्येक गाव, प्रत्येक तरुण, वयोवृद्ध, महिला, बालगोपाळ या सर्वांच्या तोंडी केवळ अण्णा हजारे हे एकच नाव होते, आणि डोक्यात सरकारविषयी तीव्र संताप होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यानंतर अशा प्रकारचे प्रेम, असा विश्‍वास आणि तीच निष्ठा देशवासीयांकडून कुणाच्या वाट्याला आली असेल तर ती फक्त अण्णा हजारे यांच्याच वाट्याला आली आहे. प्रतिगांधी म्हणून अख्खा देश हजारे यांच्या प्रेमात पडला आहे. त्यांच्याकडून भारताच्या उज्ज्वल भवितव्याची आशा ठेवून आहे. इंटरनेटविश्‍वाने आखाती देशातील क्रांती यशस्वी करण्यात मोठी भूमिका बजावली होती. आता हजारेंच्या आंदोलनाच्यानिमित्ताने या विश्‍वाची ताकद देशवासीयांनादेखील पाहावयास मिळाली. कोट्यवधी इंटरनेटधारकांनी सरकारचा निषेध नोंदवत हजारे यांना पाठिंबा दिला होता. जंतर मंतर येथील आंदोलकांची संख्या वाढण्यात या क्षेत्राचा मोठा वाटा राहिला. सरकार हादरून गेले ते इंटरनेटवर हजारे यांना मिळत असलेला पाठिंबा पाहून. कारण देश-विदेशातदेखील हजारे यांच्या आंदोलनाची माहिती क्षणाक्षणाला जात होती आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरेत प्रतिष्ठा असलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रतिष्ठेचा बुरखा टराटरा फाडल्या जात होता. या देशाला भ्रष्टाचार्‍यांच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी क्रांतीची गरज होती. या क्रांतीची बीजे आता अण्णा हजारे यांनी रोवलेली आहेत. जनलोकपाल विधेयकाच्या माध्यमातून भविष्यात भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे प्रयत्न होतील. सामान्य माणूस एक शस्त्र म्हणून हे विधेयक वापरेल. हा देश भ्रष्टाचारमुक्त झाला तर हजारेंसारख्या महात्म्याला जसे समाधान मिळेल, तसेच या देशाच्या तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित होईल. देशाच्या सामर्थ्यशाली विकासासाठी हे विधेयक मैलाचा दगड ठरेल आणि हजारे यांचे ९७ तासांचे आमरण उपोषण देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिल्या जाईल.

Sunday, August 08, 2010

चंद्रबाबूंना चपराक!
गोदावरी नदीवर नांदेड जिल्ह्यात उभारल्या जात असलेल्या बाभळी बंधाराप्रकरणी सहकार्‍यांसह आदळआपट करूनदेखील आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तथा तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांच्या हाती फारसे काही लागले नाही. नायडू यांनी तेलंगणातली विधानसभेची पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेले हे बाभळी बंधार्‍याचे राजकारण उलटपक्षी त्यांच्यावरच उलटले, हे बरे झाले. चंद्रबाबू हे नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत त्यांच्या फौजफाट्याने आले होते. पोलिसांशी हुज्जत घालणे, सिनेमातील नटासारखे डोळे लालबुंद करुन हातवारे करणे, विमानतळावर गोंधळ घालणे, महाराष्ट्राच्या पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा शिमगा करणे, हा सर्व राजकीय दंगा त्यांनी येथेच्छ केला होता. त्यांच्या या आदळआपटमागे राजकीय उद्दीष्ट असल्याचे तेलंगणातल्या जनतेने ओळखले होते. वास्तविक पाहता, चंद्राबाबू तेलगू सिनेमाचे पूर्वी दिग्दर्शक होते. तर, त्यांचे सासरे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामाराव हे कुशल अभिनेते होते. आपणही खुलेआम एखाद्या अभिनेत्यासारखी चमकोगिरी करावी आणि मतदारांना हातोहात फसवावे, असे त्यांना वाटले असावे. पण, महाराष्ट्रातल्या बंदीवासात पंचतारांकित सुविधा घेत ऐषआरामात राहिलेल्या या आपल्या भोंदू नेत्याचे पितळ त्यांच्याच सुज्ञ जनतेने उघडे पाडले. मुळात बाभळीच्या पाणीसाठ्याचा वाद हा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचा अद्याप निकाल येणे बाकी असताना, चंद्रबाबू व त्यांच्या सहकार्‍यांनी जाणुनबुजून फक्त निवडणुकीसाठीच आंदोलनाचा शिमगा केला होता. खरे तर गेली पाच वर्षे या मुद्द्यावर त्यांची दातखिळी बसलेली होती का?. हा प्रश्न निर्माण होतो आहे. वास्तव असे आहे, की बाभळी बंधार्‍याच्या बांधकामामुळे तेलंगणातल्या शेतकर्‍यांचे काहीही नुकसान होणार नाही, गोदावरीचे त्यांच्या वाट्याचे पाणी त्यांना मिळणारच आहे. ही बाब माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चंद्राबाबूंना चांगलीच माहीत आहे. तरीदेखील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला राजकीय टांग मारण्यासाठी त्यांनी हा सर्व उपद्व्याप केला. पण, तो त्यांच्या अंगलट आला. त्यांच्या या उपद्व्यापाने त्यांची अवस्था तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले अशी झाली आहे. खरे तर या माजी मुख्यमंत्र्याने एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याची काहीही गरज नव्हती. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात नरमाईची भूमिका घेतली होती. परंतु, या भूमिकेचा गैरफायदा घेऊन बाभळीचे पाणी पेटविण्याचा प्रयत्न करणार्‍या चंद्राबाबूंना तेलंगणाच्या सुज्ञ मतदारांनी गोदावरीचे पाणीच पाजले, असे म्हणावे लागेल. पोटनिवडणूक झालेल्या 12 पैकी 11 जागा तेलंगण राष्ट्र समितीला आणि एक जागा भारतीय जनता पक्षाने जिंकून या भागातील मूळ समीकरण कायम ठेवले. चंद्राबाबू यांच्या पक्षाच्या बाराही उमेदवारांना अनामत रक्कमही वाचविता आली नाही. नको त्या वेळी नको त्या प्रश्नावर आंदोलन केल्यास काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्या या आंदोलनाकडे आणि आंदोलनाच्या फलनिष्पत्तीकडे पाहावे लागेल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाललेल्या चंद्राबाबू यांचे हे आंदोलन बुडत्याचा पाय बाभळीत याचीच प्रचिती देणारे होते. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारांनाही मतदारांनी साफ धुडकावले व तेलंगण राष्ट्र समितीला पोटनिवडणुकीत मिळालेल्या या यशाने तेलंगणाच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीला पुन्हा जोर चढेल, असे संकेत आता मिळू लागले आहेत. बाभळीच्या पाण्याने तेलंगणातील जनतेला थंडाव्याचा आभास देऊन त्यांच्या मतांवर आंध्रातील आपली गेलेली पत मिळविण्याची स्वप्ने पाहणार्‍या चंद्राबाबू यांना बाभळीच्या काट्यांनी रक्तबंबाळ केले आणि मतदारांनी ठेंगा दाखवून त्यांची उरली-सुरली पतही बाभळीच्या पाण्यात बुडवून टाकली, अशा या मानहानीतून बोध घेईल, ते चंद्रबाबू कसले. आता पुन्हा त्यांनी बाभळीप्रश्नी आंदोलनाची हाक दिली आहे. वास्तविक पाहाता, तेलंगणामध्ये चंद्रबाबू यांनी व त्यांच्या पक्षाने तेलंगणातल्या जनतेचा विश्वास केव्हाच गमावला असून, मतदार पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकतील, असे चित्र नजीकच्या काळात तरी दिसणारे नाही. स्वतंत्र तेलंगणाचे पुरस्कर्ते टी. चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी उपोषण केल्यावर, ती मागणी मान्य केल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. परंतु, मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी आदळआपट केल्याने कॉंग्रेसला घुमजाव करावे लागले. त्यामुळे तेलंगणातली जनता कॉंग्रेसवर संतप्त होती. नोव्हेंबर 2009 मध्ये टी. चंद्रशेखर राव यांनी केलेल्या बेमुदत उपोषणाच्या आंदोलनात तेलंगणातली जनता उत्स्फूर्तपणे सामील झाली होती. त्यांचे उपोषण संपेपर्यंत या भागातले सारे जनजीवन हिंसक आंदोलनामुळे पूर्णपणे ठप्प झाले होते. स्वतंत्र तेलंगणाला विरोध करण्यासाठी आंध्राच्या अन्य भागात चंद्रबाबू आणि कॉंग्रेसची झालेली प्रतीआंदोलने राजकीय संधीसाधूपणाची आणि पक्षीयहित साधण्यासाठीची होती. टी. चंद्रशेखर राव यांच्या दोन वेळच्या आंदोलनामुळे आंध्रात हिंसाचाराचा वणवा पेटला, हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. आंदोलनाच्या झळा सर्वसामान्य जनतेला सोसायला लागल्या होत्या. आंध्रात कॉंग्रेसची सत्ता कायम रहावी, या राजकीय हेतुनेच केंद्र सरकारने स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीला मान्यता दिली होती. ते बुमरँग सरकारवर उलटल्यानंतर छोट्या राज्यांच्या निर्मितीच्या चक्रव्यूहात सत्ताधारी अलगद अडकले होते. अनेक राज्यांनी म्हणजे, त्यात महाराष्ट्रातल्या विदर्भानेदेखील स्वतंत्र राज्याची हाक दिल्याने केंद्र सरकार चांगलेच गोचीत आल्याचे चित्र निर्माण झाले होते. तेलंगणातील अपयशाचे तेल बाभळीच्या वड्यावर काढण्यासाठी चंद्रबाबूंनी नौटंकी केली खरी; परंतु, त्यांना सपाटून मार खावा लागल्याने, यातून ते काही बोध घेतील, असे वाटत नाही. वास्तविक पाहता, याप्रश्नी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असता, दोन्ही राज्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे ठरले आहे. तरीदेखील हा वाद चिघळत राहावा, अशी सुप्त इच्छा चंद्रबाबू राजकीय फायद्यासाठी ठेऊन आहेत.
पुरूषोत्तम सांगळे