...
भारतात सध्या माओवादी किंवा नक्षलवाद्यांनी सशस्त्र धुमाकूळ घातला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी आपण लढत आहोत, असे ही मंडळी सांगतात. गेल्या कित्येक दशकांपासून त्यांचा रक्तपात सुरु असून, आपलीच माणसे ही मंडळी मारत आहेत. दुसरीकडे, सामाजिक परिवर्तनाची गरज म्हणून योगगुरु रामदेव बाबांनी सशस्त्र दल उभारण्याची घोषणा केली आहे. बाबांकडे ११०० कोटी रुपयांचा पैसा आहे. अशाप्रकारचे मूलतत्ववादी दल ते उभारू शकतात. परंतु, त्याचे सामाजिक परिणाम काय होतील, याचा विचार बाबांनी केला आहे का? सरकार ऐकत नाही म्हणून सेना उभारण्याच्या बाबांच्या विचारांना कुणीही पाठिंबा दिला नाही. या देशात राष्ट्रपित्याने आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र सामान्य माणसांच्या हाती दिले आहे. ते शस्त्र म्हणजे अहिंसा. अण्णा हजारे हेच शस्त्र घेऊन सरकारविरुद्ध लढतात आणि त्यात कोणतेही सरकार पराभूत होते. रामदेव बाबा मात्र हे शस्त्र हाती घेऊन पराजित का झाले, याचा विचार त्यांनी करावा. अहिंसेचे आयुध वापरणारा शुद्ध चारित्र्याचा असावा लागतो, तेव्हा आंदोलन यशस्वी होते. रामदेव बाबा नेमके येथेच कमी पडले आहेत.
...
पोलिसी दमनाच्याविरुद्ध बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक तथा देशाचे दुसरे गांधी अण्णा हजारे यांनी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनानंतर हजारे यांनी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला १५ ऑगस्टपर्यंत अंतिम मूदत दिली असून, अन्यथा स्वातंत्र्याची दुसरी लढाई अहिंसेचे शस्त्र हाती घेऊन लढण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई व विदेशात दडविलेला ४०० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात परत आणण्यात यावा, या मागणीसाठी योगगुरु रामदेव बाबा यांनी आमरण उपोषण सुरुच ठेवले असून, आता त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. बाबांच्या सर्व मागण्या केंद्र सरकारने यापूर्वीच मान्य केलेल्या आहेत. या सर्व उपोषणांवरून उन्हाळ्याच्या दिवसांत बातम्यांचा दुष्काळ भोगणार्या मीडियाला चांगल्या स्टोरीज मिळाल्या असून, रात्रंदिवस वृत्तवाहिनी चालविण्यासाठी चांगळे दळण दळायला मिळाले आहे. आपल्या उपोषणादरम्यान रामदेव बाबांनी ११ हजार युवकांचे सशस्त्र संघटन उभे करण्याची घोषणा केली, या घोषणेने आता राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. बाबांवर पोलिसी अत्याचार झाला म्हणून, बाबा या देशात सशस्त्र दल तयार करत आहेत, तर दुसरीकडे या देशातील माओवादी किंवा नक्षलवादीदेखील सशस्त्र लढा देत, आपल्याच सरकारी यंत्रणांच्या मुळावर उठले आहेत. या लोकांचादेखील अत्याचाराला विरोध व समतेचे राज्य आणण्यासाठी संघर्ष सुरु असल्याचे ते सांगत असतात. बाबा सशस्त्र दल उभारून या देशात यादवी निर्माण करण्याचे षडयंत्र तर रचत नाही ना, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. रामदेव बाबांच्या या विचारांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हजारे हे गांधीवादी असून, अहिंसा हेच सर्वात मोठे शस्त्र असल्याचा त्यांचा विश्वास आहे. रामदेव बाबांचे उपोषण हे आता खरे तर संशयाच्या भोवर्यात सापडले आहे. बाबा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असल्याचा मुद्दा केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांना चव्हाट्यावर आणला होता. तमिळनाडूमध्ये झालेल्या संघाच्या एका बैठकीत बाबांच्या आंदोलनाचा कट शिजला होता, असा खुलासाही चिदंबरम् यांनी केला आहे. योग ते राजकारण हा जो प्रवास रामदेव बाबा करत आहेत, त्या अनुषंगाने अनेक बाबी बाबांविषयी आता संशय निर्माण करतात. राजकीय स्थिरतेसाठी काळा पैसा हा एक चांगला मुद्दा बाबांनी हाती घेतला असला तरी वेळोवेळी राजकीय पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे बाबा हा मुद्दा त्यांच्या राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरूनदेखील उपस्थित करू शकले असते. एकीकडे, केंद्र सरकारने बाबांच्या पूर्ण मागण्या मान्य केल्या असताना आता ते उपोषण का करत आहेत, हादेखील मोठा मुद्दा सामोरे येतो. राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध जर त्यांचे हे उपोषण असेल तर तसे ते का सांगत नाहीत, त्यामुळे समाजजीवनदेखील त्यांच्या गूढ भूमिकांमुळे त्यांच्यावर नाराज झाले आहे. हजारे यांनी बाबांच्या समर्थनार्थ राजघाटावर उपोषण करताना शुद्धचारित्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बाबांच्या चारित्र्याबाबत मात्र अनेक बाबी वादग्रस्त आहेत. बाबांकडे फार कमी काळात ११०० कोटी रुपयांची संपत्ती एकवटली असून, त्यांचा अतिनिकटवर्तीय सहकारी आचार्य बाळकृष्णन् हा नेपाळी गुन्हेगार निघाला आहे. विदेशात असलेले कोट्यवधींचे बेट त्यांना भेट मिळाल्याचे ते सांगतात खरे परंतु, याबाबतदेखील वेगवेगळी चर्चा ऐकावयास मिळते. एकंदरित हजारो कोटींचा हा स्वामी शुद्धचारित्र्याचा म्हणून फार कमी लोकं स्वीकारायला तयार आहे. हजारे यांनी अत्यंत गर्वाने सांगितले होते, की त्यांच्याकडे एक खाली थैली आणि झोपन्यासाठी अंथरुण सोडले तर काहीही नाही, अशी भूमिका रामदेव बाबा सार्वजनिकरित्या घेऊ शकतात का? या देशातील सुरक्षा यंत्रणा समाजहिती असताना रामदेव बाबा दुसरी सशस्त्र सेना तयार करण्याचे घाटत आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्याची गरज म्हणून अशाप्रकारची सशस्त्र सेना उभारली होती. परकीय इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्याकाळी ती अत्यावश्यक बाब होती. आता अशाप्रकारची कोणतीही गरज नसताना या देशात यादवी निर्माण करण्यासाठी बाबा हा उपद्व्याप का करत आहेत? राष्ट्रपिता महात्मा गांधींचे अहिंसा हे शस्त्र घेऊन लढणारे अण्णा हजारे आत्मक्लेश करून त्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेऊ शकतात, कोणतेही सरकार त्यांच्या पुढे झकत आले आणि यापुढेही झुकणारच आहे. त्यासाठी त्यांना सेना उभी करण्याची गरज वाटत नाही. हजारे यांच्यासारखे शुद्धचारित्र्य रामदेव बाबा कमाविणार नसतील, तर अशा कितीही सेना त्यांचे इप्सित साध्य करून देणार नाही, हे बाबांनी लक्षात घेण्याची गरज आहे.
Sunday, June 12, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment