भ्रष्टाचार हा या देशाला लागलेला कलंक आहे आणि हा कलंक कायमस्वरूपी मिटवल्या जावा, यासाठी कठोरात कठोर कायदा व्हावा, ही प्रत्येकाचीच इच्छा होती. वाढत्या भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका कोणाला बसत असेल तर तो या देशातल्या युवा पिढीला. शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लागणार्या सरकारी दाखल्यांपासून ते पुढे शासकीय नोकरी मिळवण्यापर्यंत पैसा चारल्याशिवाय कामेच होत नाही, हा विदारक अनुभव ही पिढी घेत आली होती. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी अण्णा हजारेंच्या रूपाने जेव्हा एक महात्मा नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आमरण उपोषणास बसला तेव्हा पीडलेली, संतापलेली हीच युवा पिढी अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि एका नव्या क्रांतीची पहाट या देशात उजाडली. भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ ठरणारे लोकपाल विधेयक तत्काळ मंजूर व्हावे, यासाठी तब्बल ९७ तासांचे आमरण उपोषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत केले. प्रारंभी हे उपोषण गांभीर्याने न घेणार्या केंद्र सरकारला देश जेव्हा हजारेंच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसले तेव्हा हजारेंसमोर झुकण्याशिवाय कोणतेही गत्यंतर राहिले नाही. जनलोकपाल विधेयकाबाबत वारंवार चर्चा होत आली आहे. या विधेयकाच्या लागू होण्याने देशातील भ्रष्टाचार्यांना कठोरात कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, किंबहुना भ्रष्टाचार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. खरे तर जनकल्याणाचा वसा घेणार्या कोणत्याही सरकारने स्वत:हून हे विधेयक पारित करून घ्यायला हवे होते. परंतु, तसे झाले नाही. सर्वच पक्ष हे भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाला हे विधेयक नको आहे, शिवाय कॉंग्रेससारख्या सर्वाधिक भ्रष्ट पक्षाला तर या विधेयकाचे सर्वाधिक वावडे राहात आले आहे. हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी आमरण उपोषण छेडले नसते तर कदाचित या विधेयकाबाबत भिजत घोंगडे असेच कायम राहात आले असते. या विधेयकासाठी मसुदा समिती गठीत करणे आणि या समितीवर कलंकीत मंत्र्यांना न घेणे तसेच त्यातील अर्धे सदस्य सामान्य नागरिकांतून असावेत, असा एक आग्रह हजारे यांनी सरकारकडे धरला होता. तसेच, या समितीचा अध्यक्ष हा सामान्य नागरिकांतून असावा, असाही त्यांचा आग्रह होता. ही मागणी मान्य करण्यासाठी तसेच पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडणार असल्याचे सांगण्यासाठी केंद्र सरकारने अण्णांसारख्या महात्म्याला तब्बल ९७ तास आत्मक्लेश करण्यास भाग पाडले. परंतु, त्यांच्या या आत्मक्लेशातून देशभर एका क्रांतीची लाट उसळली. जंतर मंतर या उपोषणस्थळाला तहरीर चौकाचे स्वरूप आले आणि आखाती देशांप्रमाणे भारतातदेखील सत्तापालटाची जोरदार लढाई सुरू होते की काय, असे वातावरण निर्माण झाले. सरकारने अण्णांच्या आत्मक्लेशाची सत्त्वपरीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला असता, तर अण्णांचे हेच आमरण उपोषण देशाच्या दुसर्या स्वातंत्र्याची लढाई ठरले असते आणि पिचलेले, हताश झालेले कोट्यवधी तरुण या आंदोलनात सक्रिय होऊन, सत्तापालट घडविण्यात आला असता. कदाचित देश एका रक्तरंजित क्रांतीच्या दिशेनेही गेला असता. या देशातील तरुणांच्या आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम हजारे यांच्या या उपोषणातून झाले आहे, ही फार फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. देशावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेव्हा हा देश एकवटत असतो, असा अनुभव आहे. अशा वेळी संपूर्ण बॉलिवूडदेखील आपल्या नैतिक भूमिकेशी प्रामाणिक राहात, देशहितासाठी पुढे सरसावत असते. याचा प्रत्यय हजारे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला. अख्खे बॉलिवूड हजारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. महानायक अमिताभ बच्चन ते आमीर खान या सर्वांनी हजारे यांच्या आंदोलनाला देशहिताची लढाई ठरवून क्रिकेटपेक्षा जास्त पाठिंबा देण्याचे आवाहन देशवासीयांना केले. देशात अण्णांच्या आंदोलनाची जोरदार लाट निर्माण करण्यास बॉलिवूडचे तारे खर्या अर्थाने यशस्वी झालेत. प्रत्येक शहर, प्रत्येक गाव, प्रत्येक तरुण, वयोवृद्ध, महिला, बालगोपाळ या सर्वांच्या तोंडी केवळ अण्णा हजारे हे एकच नाव होते, आणि डोक्यात सरकारविषयी तीव्र संताप होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यानंतर अशा प्रकारचे प्रेम, असा विश्वास आणि तीच निष्ठा देशवासीयांकडून कुणाच्या वाट्याला आली असेल तर ती फक्त अण्णा हजारे यांच्याच वाट्याला आली आहे. प्रतिगांधी म्हणून अख्खा देश हजारे यांच्या प्रेमात पडला आहे. त्यांच्याकडून भारताच्या उज्ज्वल भवितव्याची आशा ठेवून आहे. इंटरनेटविश्वाने आखाती देशातील क्रांती यशस्वी करण्यात मोठी भूमिका बजावली होती. आता हजारेंच्या आंदोलनाच्यानिमित्ताने या विश्वाची ताकद देशवासीयांनादेखील पाहावयास मिळाली. कोट्यवधी इंटरनेटधारकांनी सरकारचा निषेध नोंदवत हजारे यांना पाठिंबा दिला होता. जंतर मंतर येथील आंदोलकांची संख्या वाढण्यात या क्षेत्राचा मोठा वाटा राहिला. सरकार हादरून गेले ते इंटरनेटवर हजारे यांना मिळत असलेला पाठिंबा पाहून. कारण देश-विदेशातदेखील हजारे यांच्या आंदोलनाची माहिती क्षणाक्षणाला जात होती आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरेत प्रतिष्ठा असलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रतिष्ठेचा बुरखा टराटरा फाडल्या जात होता. या देशाला भ्रष्टाचार्यांच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी क्रांतीची गरज होती. या क्रांतीची बीजे आता अण्णा हजारे यांनी रोवलेली आहेत. जनलोकपाल विधेयकाच्या माध्यमातून भविष्यात भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे प्रयत्न होतील. सामान्य माणूस एक शस्त्र म्हणून हे विधेयक वापरेल. हा देश भ्रष्टाचारमुक्त झाला तर हजारेंसारख्या महात्म्याला जसे समाधान मिळेल, तसेच या देशाच्या तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित होईल. देशाच्या सामर्थ्यशाली विकासासाठी हे विधेयक मैलाचा दगड ठरेल आणि हजारे यांचे ९७ तासांचे आमरण उपोषण देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिल्या जाईल.

No comments:
Post a Comment